हरिपाठ हा सूत्रबद्ध ग्रंथ आहे. त्याच्या एकेका शब्दातून अनेक छटा एकाचवेळी बाहेर पडतात. हरिपाठ हा जीवनाला व आनंदाला समृद्ध करणारा साधनामार्ग आहे. हरिपाठ सोपा आहे, सर्वसाधारण लोकांसाठी आहे, पण हरिपाठ समजण्यासाठी त्याचा अभ्यास हवा. त्यातील सूत्र समजून घेण्यासाठी प्रशिक्षण हवं, असं हे पुस्तक सांगतं. हरिपाठ एका विचारसरणीचं नाव आहे. सिद्धान्ताचा समूह म्हणजे हरिपाठ. हरिपाठ मंथन या पुस्तकात मोजक्या सिद्धान्तावर चिंतन केलं आहे. अभ्यासू, विचार करणाऱ्यांना हे पुस्तक दिशा देतं, मार्गदर्शन करतं. हरिपाठाची रचना दिसायला सहज, सोपी आहे परंतु समजायला कठिण आहे. सहज आणि सोप्या निरुपणामुळे हरिपाठातील अभंग समजून घ्यायला सहज शक्य होतात. ओघवती भाषा, हरिपाठातील अभंग, भगवद्गगीतेतील श्लोकांचा आधार आणि 'सार असार विचार' ही ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली हरिपाठाची व्याख्या या सगळ्याचा आधार घेत लेखकाने हरिपाठ समजावून सांगितला आहे. लेखकाविषयी : लेखक हे पारंपरिक वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असून त्यांचं सुरुवातीचं शिक्षण आळंदीतील 'वारकरी शिक्षण संस्था' येथे झालं. त्यानंतर संस्कृत साहित्यात सर्वात कठीण असणाऱ्या 'न्यायशास्त्रा' चं शिक्षण श्रीगुरु श्री १००८ स्वामी काशिकानन्दगिरीजी महाराज द्वादशदर्शनाचार्य आनंदवन आश्रम कांदिवली, मुंबई येथे झालं. गुरुकुल पद्धतीने ९ वर्ष शिक्षण घेऊन वाराणसी विद्यापीठाची 'न्यायाचार्य' ही पदवी त्यांनी संपादन केली. तसेच पुणे विद्यापीठातून एम.ए. (मराठी) करून 'वारकरी संतांची कूटरचना' या विषयावर मराठवाडा विद्यापीठातून पीएच. डी. संपादन केली. सध्या ते श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत असून त्यांचे ज्ञानेश्वरी व संस्कृतचे अध्ययन-अध्यापन चालू आहे.
Author: Nyayacharya Shri. Namdeo Maharaj Shastri | Publisher: Sakal Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 197
