श्रीगुरुचरित्र कथासारासहित (Shrigurucharitra Kathasarasahit) By Jitendranath Thakur.
Shri Gurucharitra ( ओवी बद्ध अध्याय , प्रत्येक अध्याय सुरु होण्यापूर्वी त्या अध्यायाचा मराठीतून भावार्थ कथासार, पारायण पद्धती,स्तोत्रे,आरती या सह)
श्रीगुरुचरित्राविषयी थोडक्यात माहिती
श्रीसरस्वती गंगाधर विरचित 'श्रीगुरुचरित्र' हा अत्यंत प्रासादिक व रसाळ ग्रंथ आहे. गुरुसंस्थेचे माहात्म्य वर्णन करणारा हा ओवीबद्ध ग्रंथ कालातीत आहे. नामधारकांच्या प्रश्नाचे निमित्त करून सिद्धांनी त्रिमूर्ती दत्तात्रेयांची अवतार कथा, अंबरीष राजांची कथा, धौम्य ऋषींची कथा, इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन केलेले असले, तरी श्रीगुरुचरित्राचा मुख्य विषय श्रीनृसिंहसरस्वती यांचे अलौकिक अवतारी चरित्र सांगणे हा आहे. या अपूर्व चरित्रग्रंथात श्रीदत्तात्रेय, श्रीपादश्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती या तीन अवतारी पुरुषोत्तमांचे अवतारकार्य प्रकट झालेले आहे. याच्या पहिल्या नऊ अध्यायांत श्रीपादश्रीवल्लभांचे अवतारकार्य प्रकट झालेले आहे. दहाव्या अध्यायात त्यांच्या निर्गुण अस्तित्वाचे वर्णन करून नंतर अकराव्या अध्यायापासून शेवटपर्यंत श्रीनृसिंहसरस्वतींचे अवतारकार्य विस्ताराने प्रकट झालेले आहे. खरे सांगायचे, तर अकराव्या अध्यायापासूनच या अद्वितीय श्रीगुरुचरित्राला प्रारंभ होतो. हा दत्तसंप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि आचारधर्म यांचे सखोल विवरण करणारा, एक अजोड ग्रंथ आहे. दत्तसंप्रदायात 'श्रीगुरुचरित्र' वेद म्हणून मान्यता पावले आहे. या चरित्रग्रंथाने पुराणातील पंचलक्षणांचे शाश्वत संकेत भक्तिभावाने पाळलेले आहेत. 'श्रीगुरुचरित्र' या ग्रंथाचे कर्ते श्रीसरस्वती गंगाधर हे एक श्रेष्ठ दत्तोपासक होते. ते श्रीनृसिंहसरस्वतींचे पट्टशिष्य सार्यदेव यांचे पाचवे वंशज होते. श्रीनृसिंहसरस्वतींच्या अवतारकार्याची समाप्ती झाल्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी म्हणजे शके १४५० (इ. स. १५२८) दरम्यान 'श्रीगुरुचरित्र' प्रकट झाले. या ग्रंथाच्या आरंभी श्रीसरस्वती गंगाधरांनी आपली जी पूर्वपरंपरा सांगितली आहे, त्यावरून श्रीसरस्वती गंगाधर हे आपस्तंभ शाखेचे कौंडिण्यगोत्री ब्राह्मण होते. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांच्या आईंचे नाव चंपा. त्या आश्वलायन शाखेच्या काश्यपगोत्रातील चौंडेश्वर नावाच्या साधुपुरुषांच्या कन्या होत्या.
श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात,
दत्त बसे औदुंबरी । त्रिशूळ डमरू जटाधारी ।। कामधेनू आणि श्वान। उभे शोभती समान ।। गोदातीरी नित्य वस्ती। अंगी चर्चिली विभूती ।। काखेमाजी शोभे झोळी। अर्धचंद्र वसे भाळी ।।
Author: Jitendranath Thakur | Publisher: Dharmik Prakashan Sanstha | Language: Marathi | Binding: Hardcover | No of Pages: 568
