श्री. प्रमोद केणे हे विज्ञानाचे उच्चशिक्षित पदवीधर असून आपल्याप्रमाणेच सांसारिक आहेत. त्यांनी काही काळ छोटा रासायनिक उद्योगही यशस्वीपणे चालवला होता. याचबरोबर उत्कट दत्तभक्ती, अनामिक प्रेरणा व अद्भुत संकेत यांमुळे त्यांच्या जीवनप्रवाहाला विलक्षण कलाटणी मिळत गेली. अशाच प्रेरणेने त्यांनी दर पौर्णिमेस एक याप्रमाणे १०८ गिरनार वाऱ्यांचा संकल्प सोडला. त्यानंतरही श्रीदत्तकृपेने दर पौर्णिमेची त्यांची गिरनार यात्रा आजही अखंडपणे चालू आहे. आजपर्यंत त्यांनी पौर्णिमा आणि पौर्णिमेव्यतिरिक्त दोनशेच्या वर वाऱ्या केल्या आहेत. या काळात त्यांचा कस पाहणारी कितीतरी संकटे आली. धंद्यातील क्लेश, आर्थिक कोंडी, यात्रेदरम्यान प्रतिकूल हवामान - एक न दोन असे अनेक प्रसंग; भक्ति आणि श्रद्धेची कसोटी पाहणारे. पण त्यांचा निश्चय कधीच ढळला नाही. "सदा सर्वदा देव सानिध्य आहे. कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे'', हेच खरे. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे गिरनारची एकेक पायरी तुम्हाला दुर्गुणाची एकेक वस्त्रे सोडायला लावते, शिकवते हे त्यांनी अनुभवले.
श्रद्धेतून प्रेरणा, प्रेरणेतून अनुभूती, अनुभूतीतून दर्शन असा हा प. पु. श्री. केणे काकांचा प्रवास आहे. यातूनच दत्तभक्तीचा प्रसार आणि सामान्यांना अध्यात्मिक मार्गदर्शन याचा वसा त्यांनी स्वीकारला. तसेच श्रीदत्त आदेशानुसार लोककल्याणासाठी शिवदत्त मंदिराची स्थापना (चौल, जिल्हा रायगड) मासिक याग स्वतःच्या अनुभूतीवर आधारित प्रवचने आणि साधकांना मार्गदर्शन असे त्यांचे बहुआयामी कार्य चालू आहे.
या दीर्घ प्रवासात प. पु. श्री. केणे काकांना ईश्वरी लीलेचे अनुभव येत गेले व येत आहेत. हे अनुभव हेच मार्गदर्शन. असे मोजके अनुभव ते सांगत आहेत व आपल्यालाही या लीलेत सहभागी करून घेत आहेत. हे केवळ चमत्कारिक वर्णन नव्हे, हे अधात्माच्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्यांना अनमोल मार्गदर्शन आहे . त्याचा साधकांना निश्चित लाभ होईल.
"सद्गुरू प्रसादे पावन झालो, दत्तामयी जाहलो."
Author: Pramod Kene | Publisher: Pramod Kene | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 150
