पुन्हा तुकाराम’ मराठी साहित्य कोपर्निकन क्रांती करणारी कृती आहे असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. मराठी काव्यविश्वाच्या केंद्रस्थानी तुकोबा आणि इतर कवी परिघावर अशी एक प्रकारची उत्पाती उलटापालट चित्रे यांनी घडवून आणली. या सगळ्यात मुद्दा तुकारामगाथेचे वारंवार काळजीपूर्वक परिशीलन करून (ही एक प्रकारची वारीच) तिच्यात अनुस्युत असलेली काव्याची संकल्पना स्पष्ट करणे, स्वत: तुकोबांच्या काव्यजाणिवेवर प्रकाश टाकणे आणि त्यातून काव्यसमीक्षेची काही मूल्ये हाती लागतात का हे पाहणे, तसेच त्यांचा मराठी संवेदनस्वभावाशी आणि संस्कृतीशी ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून संबंध जोडून आवश्यक होते हा आहे. चित्र्यांनी नेमके हेच केलेले आहे. ‘पुन्हा तुकाराम’मध्ये चित्र्यांनी तुकोबा मराठी वाङ्मयाच्या केंद्रस्थानी असा सिद्धान्त मानून त्यानुसार आता मराठीचे स्वतंत्र पण वैश्विक संदर्भात मांडण्याजोगे काव्यशास्त्र दृग्गोचर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकोबा हा आपण चौफेर वाचलेल्या जागतिक कवितेतला एक अनन्य चमत्कार आहे असे ते म्हणतात. तुकोबांच्या गाथेतील काव्यसंकल्पना एकदा मान्य केली तर वरील तिन्ही परंपरांमधली, बैठकीत किंवा विद्यापीठात किंवा रसिकांच्या संमेलनात आस्वादण्यासाठीच निर्माण केलेली कविता थिटीच दिसू लागते.
Author: Dilip Purushottam Chitre | Publisher: Popular Prakashan | Language: Marathi | Binding: Hardcover | No of Pages: 375
