‘सीतेची गोष्ट आणि इतर कथा’ हे ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांच्या निवडक कथांचे संपादन वंदना बोकील कुलकर्णी यांनी केले असून, सुरेश एजन्सीतर्फे २३ मेला हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने पुस्तकाच्या प्रस्तावनेतील अंश…
अरुणाताईंच्या लेखन कारकीर्दीला पंचेचाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्यांच्या निवडक कथा संग्रहरूपाने वाचकांच्या हाती सोपवताना आनंद वाटतोय. या संग्रहात त्यांच्या एकोणीस कथांचा समावेश केला असून, पूर्वी संग्रहात न आलेल्या काही कथादेखील वाचायला मिळतील. अरुणा ढेरे यांच्या कथाविश्वाचे ठळकपणे दोन भाग दिसतात. एक आहे प्राचीन साहित्यातील कथांच्या आशयाचा किंवा व्यक्तिरेखांचं पुनर्निर्माण करणारा. काही अतिप्राचीन तर काही अलीकडच्या इतिहासाचा. काही केवळ लोककथांतून नजरेत येणारा.
रामायण, महाभारत, पुराणं, लोकसाहित्य इत्यादी संचिताचा व्यासंग आणि चिंतन यांमधून या कथा त्यांच्या प्रतिभेनं नव्यानं रचल्या आहेत. आधुनिक दृष्टीतून, अपार समजुतीनं आणि जिव्हाळ तरी पुरेसं वस्तुनिष्ठ असं आकलन आपल्या समोर ठेवलं आहे. या कथांतून परंपरेचा शोध घेणं, तिचा अर्थ नव्यानं आणि नव्या दृष्टीनं शोधणं, तिच्यातील आणि समकालीन वर्तमानातील पूल शोधणं, तो सूचित करणं हा एक अर्थसंपन्न अनुभव असतोच. अशा कथांचा, अशा व्यक्तिरेखांचा आत्मा लेखिकेला नेमका सापडला आहे. सामान्यत: प्रत्येक भारतीय माणसात आपल्या प्राचीन वारशाचं प्रेम असतं, अस्मिता असते. रक्तात ओढ असते तो जाणून घेण्याची. अनेक अनुच्चारित प्रश्न असतात त्यांची उत्तरं मिळून जातात आणि अशा कथांच्या लोकप्रियतेचं एक रहस्य काहीसं उलगडतं. माहितीचं रूपांतर कथाघटकात करण्याचं लेखिकेचं हे कौशल्य वादातीत म्हटलं पाहिजे.
Author: Aruna Dhere | Publisher: Suresh Agency | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 296