श्रीकृष्णचरित्रांतील कृष्णजन्मापासून मथुरागमनापर्यंतचा कथाभाग या पस्तीस गीतांतून गुंफला आहे. विरही राधेला स्फुरला असेल, स्मरण असेल तसा.
पुरेत गाणीं शृंगाराचीं । कृष्णसख्याच्या व्यभिचाराची ॥
असें ज्यांना खरेंच वाटतें, त्यांच्यासाठी हा प्रयत्नच नाही. राम-कृष्णांचे देवत्व ज्यांनी श्रद्धेने मानलें आहे त्यांना हीं गीतें आवडावीं. बुद्धीचे पाय जडतेशीं जखडलेले आहेत. श्रद्धेला पंख असतात. माझे मित्र श्री. जयंतराव साळगांवकर यांच्या ‘शब्दरंजन’ मासिकासाठी या गीतावलीचा प्रारंभ झाला. मासिकाचें प्रकाशन थांबलें तेव्हा माझें लेखनहि थांबलें होतें.
श्री. भा. द. खेर व श्री. वि. स. वाळिंबे या मित्रांच्या आग्रहामुळे हीं गीतें मी पुन्हा लिहूं लागलों. सह्याद्रींतून ती क्रमश: प्रसिद्ध झालीं.
आता हीं गीतें पुस्तक-रूपाने प्रकाशित होत आहेत. ‘केसरी’ प्रकाशनाचे श्री. जयंतराव टिळक यांचा मी मन:पूर्वक ऋणी आहें.
श्री. सालकरांनी चित्रें उत्तम काढलीं आहेत. त्यांचे आभार.
Author: G.D.Madgulkar | Publisher: Saket Prakashan | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 87
