या चरित्रग्रंथात गौतम बुद्धांबद्दलचा भाबडा आदर कुठेही दिसून येत नाही. त्याऐवजी एक प्रकारचे ज्ञानोत्तर भारावलेपण मात्र या ग्रंथात व्यक्त झाले आहे. या भारावलेपणामुळेच हा ग्रंथ कमालीच्या ओघवत्या भाषेत प्रकट झालेला आहे. प्रस्तुत चरित्रग्रंथ जास्तीत जास्त मराठी वाचकांनी अवश्य वाचायला हवा. बुद्धाच्या एकंदर बोधाचे सार मिळून इतकेच आहे की, मनुष्यांनी योग्य, सत्य व कल्याणप्रद असे ज्ञान प्राप्त करून तद्नुसार वर्तन करण्याचा दृढ संकल्प करावा आणि कष्ट करून मनोनिग्रह करण्यास झटावे आणि एकंदर प्राणिमात्रावर दया करावी व त्यास स्वशक्यनुसार साहाय्य करण्यास सर्वदा तत्पर असावे. असे केल्याने मनुष्यास परमसौख्य लाभण्यासारखे असून त्याच्या जीविताचे सार्थक्य ह्यातच आहे. याप्रमाणे ज्याने आपल्या अलौकिक बुद्धिबलाने व अप्रतिम नीतितेजाने सर्व जगास ऋणी केले आहे, त्या जगद्गुरूचा जन्म आमच्या या भारतभूमीत झाल्याबद्दल आम्हास मोठा अभिमान वाटणे साहजिक आहे आणि अशा अलौकिक साधुपुरुषाचा चरित्रमहिमा समजून घेण्याविषयी आमच्या मनात उत्कट इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. ह्या हृदयवृत्तीस वश होऊन आम्ही हे जगद्गुरू गौतम बुद्धाचे चरित्र यथाशक्ती महाराष्ट्र जनांस साद्यंत कथन केले आहे. ते चित्तपूर्वक वाचून ह्या महापुरुषाविषयी ते आपली यथार्थ बुद्धी करितील अशी उमेद आहे.
‘‘दादा केळूसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयातसुद्धा रिकाम्या डोक्याने मी बुद्धाकडे गेलो नाही. मला पार्श्वभूमी होती आणि बुद्धाच्या जीवनावरील पुस्तक वाचताना मी तुलना व भेद करीत असे. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती.’’
-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
कृ.अ. केळूसकर हे गेल्या शतकातील मोठे विचारवंत, विख्यात चरित्रकार. गौतम बुद्ध, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी या युगपुरुषांचे ते पहिले महत्त्वाचे चरित्रलेखक.
गुरुवर्य केळूसकरांमुळेच डॉ. आंबेडकरांसारखे नेते समाजास मिळाले. जनात जनार्दन पाहणारे ते ऋषितुल्य प्रज्ञावंत होेते. मामा परमानंद, न्या. रानडे या विचारवंतांनी त्यांच्या लेखणीची व विचारांची त्या काळात प्रशंसा केली.
धर्मशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, शिक्षणशास्त्र या चौफेर विषयांतील ते पंडित होते. महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ आणि मराठा ऐक्येच्छू सभेसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. ते गीता आणि बौद्ध धर्माचे भाष्यकार होते.
पुरोगामी महाराष्ट्राने केळूसकरांच्या एकूण लेखनाची म्हणावी तशी दखल घेतली नाही.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी जशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुण हेरून मदत केली तशीच मदत केळूसकरांनाही केली. गायकवाड ओरिएंटल सिरीजमध्ये ‘गौतम बुद्धांचे चरित्र’ हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यामुळेच पहिल्यांदा गौतम बुद्धांची ओळख ठळकपणे मराठी वाचकांस झाली.
‘‘गौतम बुद्धांचे चरित्र हा मराठी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथ आहे.’’
- डॉ. धनंजय कीर
Author: Krishnarao Arjun Keluskar | Publisher: Vishwakarma Publications | Language: Marathi | Binding: Paperback | No of Pages: 207